1 कोटींच्या झाडाच्या प्रकरणाला नवं वळण! शेतकरी केशव शिंदे यांचे निधन; मोबदल्याच्या पैशांवर आता काय होणार?

यवतमाळ जिल्ह्यातील एका झाडाच्या मोबदल्यावरून चर्चेत आलेल्या प्रकरणाला पुन्हा एकदा नवे वळण मिळाले आहे. शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतातील झाडाला रक्तचंदन मानून त्यासाठी 1 कोटी रुपयांचा मोबदला देण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला असून शेतकरी केशव शिंदे यांचे निधन झाले आहे.

यामुळे त्यांनी घेतलेल्या मोबदल्याच्या पैशांचे पुढे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासनानेही कोर्टात अर्ज करून मोबदल्याच्या रकमेबाबत नव्याने सुनावणीची मागणी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील खरशी गावचे शेतकरी केशव शिंदे यांच्या शेतातून वर्धा–यवतमाळ–पुसद–नांदेड रेल्वे मार्ग जात असल्यामुळे त्यांच्या काही जमिनीचे संपादन करण्यात आले होते. जमिनीचा मोबदला त्यांना मिळाला होता. मात्र त्यांच्या शेतात उभ्या असलेल्या एका झाडासाठी मोबदला मिळालेला नव्हता.

शिंदे यांनी दावा केला होता की त्यांच्या शेतात असलेले झाड रक्तचंदनाचे आहे आणि त्यासाठी मोठ्या रकमेचा मोबदला मिळायला हवा. यासाठी त्यांनी अनेक वर्षे प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी अखेर 7 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.

यानंतर न्यायालयाने प्राथमिक सुनावणीत रेल्वेला 1 कोटी रुपये मोबदला देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार रेल्वेने ही रक्कम कोर्टात जमा केली होती. त्यापैकी 50 लाख रुपये काढण्याची परवानगी शेतकरी केशव शिंदे यांना देण्यात आली होती.

झाड रक्तचंदन नाही, असा रेल्वेचा दावा

दरम्यान, झाडाचे वैज्ञानिक मूल्यांकन करण्यासाठी वनविभागाने बंगळुरू येथील लाकूड विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेकडे नमुने पाठवले होते. या संस्थेच्या अहवालात हे झाड रक्तचंदन नसून बिजासाल असल्याचे नमूद करण्यात आले.

या झाडाचे शास्त्रीय नाव Pterocarpus Marsupium असल्याचे अहवालात सांगण्यात आले. या आधारावर रेल्वे प्रशासनाने कोर्टात सांगितले की या झाडाची किंमत केवळ 10 हजार रुपये आहे.

यानंतर रेल्वेने कोर्टात अर्ज करून दिलेला मोबदला परत मिळावा अशी मागणी केली आहे.

शेतकऱ्यांचे निधन; प्रकरणात नवा ट्विस्ट

दरम्यान या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्ते शेतकरी केशव शिंदे यांचे निधन झाले आहे. त्यांना मधुमेहाचा त्रास होता आणि घरात पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांनी दिली.

शिंदे यांनी कोर्टात जमा असलेल्या 1 कोटी रुपयांपैकी 50 लाख रुपये काढले होते, तर उर्वरित 50 लाख रुपये अजूनही हायकोर्टात जमा आहेत. त्यामुळे आता त्यांनी घेतलेल्या 50 लाख रुपयांचे पुढे काय होणार, याबाबत प्रश्न उपस्थित झाला आहे.

वारसांना पैसे परत करावे लागणार?

रेल्वेच्या वतीने वकील निरजा चौबे यांनी सांगितले की न्यायालयाने हे प्रकरण खालच्या न्यायालयात पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. आता यवतमाळच्या सिव्हिल कोर्टात सुनावणी होणार असून झाड रक्तचंदन आहे की नाही, हे सिद्ध करावे लागेल.

जर झाड रक्तचंदन नसल्याचे सिद्ध झाले तर 10 हजार रुपयांची किंमत वजा करून उर्वरित रक्कम शेतकऱ्यांच्या वारसांना परत करावी लागू शकते.

शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा आक्षेप

दरम्यान शिंदे कुटुंबीयांनी रेल्वेच्या अहवालावर आक्षेप घेतला आहे. केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे यांनी सांगितले की हे झाड सुमारे 100 वर्षे जुने आहे आणि त्याचे मूल्यांकन चुकीच्या पद्धतीने करण्यात आले आहे.

त्यांच्या मते, झाडाची पर्यावरणीय किंमत, ऑक्सिजन निर्मिती आणि झाडाचे वजन यांचा विचार करून मूल्यांकन झाले तर त्याची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा जास्त होऊ शकते.

आता पुढे काय?

या प्रकरणात पुन्हा एकदा झाडाचे मूल्यांकन होणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. जर नवीन मूल्यांकनात झाडाची किंमत जास्त निघाली तर रेल्वेला अतिरिक्त मोबदला द्यावा लागू शकतो. मात्र किंमत कमी निघाल्यास शेतकऱ्यांच्या वारसांना पैसे परत करावे लागू शकतात.

सध्या हे प्रकरण यवतमाळ सिव्हिल कोर्टात चालणार असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *