Bhagat Singh : विचारवंत किरणजितसिंह यांचे प्रतिपादन
पुणे प्रतिनिधी
पुणे – Bhagat Singh : भगतसिंह हे केवळ देशासाठी हुतात्मा झालेल्या क्रांतिकारकाचे नाव नाही; तर भगतसिंह हा एक विचार व वृत्ती आहे. स्वातंत्र्यासाठी, श्रमजीवींसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि शोषितांसाठी लढणारा, संघर्ष करणारा विचार म्हणजे भगतसिंह आहे. त्यामुळे आज शरीररूपाने भगतसिंह नसले, तरी विचाररूपाने ते आजही प्रेरणादायी आहेत,” असे प्रतिपादन भगतसिंह यांचे पुतणे व विचारवंत किरणजितसिंह यांनी गुरुवारी येथे पत्रकारांशी बोलताना केले. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही सर्वसामान्य माणूस, शेतकरी यांना स्वातंत्र्य, न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करावा लागतोय, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
सरहद पुणे आणि कृष्णा पब्लिकेशन यांच्या वतीने शहीद Bhagat Singh यांच्या पुतणीने लिहिलेल्या ‘युगदृष्टा भगतसिंह आणि त्यांचे मृत्युंजयी पूर्वज’ या भगतसिंह यांच्या अधिकृत जीवनचरित्राचे प्रकाशन व शेतकऱ्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या राजू शेट्टी यांना ‘युगदृष्टा भगतसिंह राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान सोहळ्याचे शुक्रवारी (ता. २०) आयोजन केले आहे. त्यानिमित्ताने विचारवंत किरणजितसिंह पुण्यात आले असून, पुण्यातील माध्यमांशी बोलताना त्यांनी Bhagat Singhव त्यांच्या कुटुंबियांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रसंगी सरहद संस्थेचे संजय नहार, कृष्णा पब्लिकेशनचे संचालक चेतन कोळी, जीवनचरित्राच्या अनुवादक इंद्रायणी चव्हाण उपस्थित होत्या.
किरणजितसिंह म्हणाले, “भगतसिंह यांच्या घराण्यात तीन पिढ्यांपासून देशासाठी व कष्टकऱ्यांसाठी संघर्षाची परंपरा होती. देशासाठी प्राणांची आहुती देणारे क्रांतिकारक, ही त्यांची एक बाजू होती. मात्र, केवळ पिस्तुल अथवा बॉंब कधीच स्वातंत्र्य मिळवून देत नाहीत. स्वातंत्र्याच्या तलवारीला धार येते, ती विचारांच्या सहाणेवर घासूनच, ही त्यांची वृत्ती होती. हे पुस्तक कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींच्या महत्त्वपूर्ण व अधिकृत माहितीवर आधारीत आहे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व वेगळे आहे. भगतसिंह यांच्यासह बलिदान केलेल्या राजगुरू, सुखदेव तसेच सर्वच क्रांतिकारकांच्या त्यागातून आजच्या युवा पिढीने प्रेरणा घ्याव. स्वतःपलीकडे जाऊन समाजाचा, देशाचा विचार करावा, त्या विचारांतून सकारात्मक कृती घडाव्यात, हा उद्देश आहे.”
तेवीस वर्षांच्या भगतसिंहांनी दिलेले बलिदान आणि आजची युवापिढी या प्रश्नावर बोलताना किरणजितसिंह म्हणाले, “आजची युवा पिढी दिशाहीन, भरकटलेली आणि स्वकेंद्रित झालेली दिसते. न्याय्य, योग्य गोष्टींसाठी संघर्ष करण्याची प्रेरणाच अलीकडची पिढी हरवून बसली आहे. अशावेळी सरदार भगतसिंह यांच्या चरित्राच्या माध्यमातून नव्या पिढीसाठी उत्तम आदर्श उभा राहील, भगतसिंहांच्या मनातला देश प्रत्यक्षात यावा, त्यांचा संदेश नेमकेपणाने युवा मनांपर्यंत पोहोचावा, हा हेतू आहे. सत्तेतले लोक बदलतात; मात्र व्यवस्था तशीच आहे. त्यामुळे Bhagat Singh स्वराज्य अजूनही यायला वेळ लागेल. संघर्ष संपलेला नाही.”
ते पुढे म्हणाले, “स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे उलटली, तरीही अनेक समस्या तशाच आहेत. आजही शेतकरी, कष्टकरी, कामगार, महिला त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. शोषण आजही सुरू आहे. शेतकरी आत्महत्या होत आहेत. राजधानीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे सत्र सुरु आहे. स्वतः भगतसिंह यांनी आपल्या लेखनात यांचा उल्लेख केला आहे. त्याच समस्या आज सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळे भगतसिंह यांना नायकपद बहाल करण्यापेक्षा, त्यांचे विचार जाणून, समजून घेणे अधिक महत्वाचे आहे. हे पुस्तक भगतसिंहांच्या विचारांचा दस्तऐवज आहे, तो युवा पिढीपर्यंत नेण्यासाठी आमचा प्रयत्न आहे.”
‘वन नेशन, वन रिलिजन, वन इलेक्शन’ ही संकल्पना चुकीची आहे. सर्व जातीधर्माचे, विचारांचे लोक या देशात राहतात. त्यांच्यातील विविधता हीच आपल्या देशाच्या एकतेचे प्रतीक होते आणि आहे. त्यामुळे अशा संकल्पना राबविण्याचा विचार देशाला परवडणारा नाही. देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या कुटुंबीयांची परवड, संघर्ष आजही सुरु आहे. या क्रांतिकारकांचे विचार पुढील पिढ्याना समजण्यासाठी त्यांचे विचार जतन व्हावेत. युवकांनी त्यांच्या विचारांवर चालणे हेच त्यांचे खरे स्मारक ठरेल,” असे किरणजितसिंह यांनी नमूद केले.
संजय नहार यांनी भगतसिंह यांच्या विचारांचा व कार्याचा आवाका क्रांतिकार्याप्रमाणेच वंचित, शोषित घटकांना सामावून घेणारा होता, त्यांच्या लेखनातून याचा प्रत्यय येतो, असे मत मांडले. अनुवादक इंद्रायणी चव्हाण म्हणाल्या, भगतसिंह यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाने व कुटुंबातील महिला सदस्यांनी जे सहन केले व जो संघर्ष केला, त्याचीही माहिती प्रथमच उजेडात येत असल्याचा उल्लेख केला. चेतन कोळी यांनी स्वागत-परिचय करून दिला.