मद्यधुंद चालकांवर १७१ कारवाया; रांका ज्वेलर्स फसवणूक प्रकरणात १८ कोटींच्या घोटाळ्यात तिघांना अटक
पुणे – Pune Police Action : शहरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहतूक विभागाने मद्यपान करून वाहन चालवणार्यांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून, २४ ते २६ एप्रिल कालावधीत तब्बल १७१ मद्यधुंद वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बेशिस्ताविरूद्ध कारवाई करण्यात येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत बेदरकारपणे वाहने दामटणार्यांसह मद्यधुंद वाहन चालकांविरूद्ध कारवाई करण्यासाठी वाहतूक विभागाने नाकाबंदी केली आहे. ठिकठिकाणी ३३ नाकाबंदी पॉईंट उभारून वाहनांची तपासणी केली जात असून, त्याठिकाणी ब्रेथ अॅनालायझरच्या मदतीने वाहन चालकांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणार्या चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाईसह पुढील कायदेशीर प्रक्रिया केली आहे. Pune Police Action

अपघातांचे प्रमाण करणे, बेशिस्तांना धडा
अपघातांचे प्रमाण कमी करणे, रस्ते सुरक्षितता वाढवणे आणि नागरिकांमध्ये जबाबदार वाहन चालकाची जाणीव निर्माण करणे हा कारवाईचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे. वाहन चालकांनी मद्यपान करून वाहन चालवणे टाळावे, विरूद्ध दिशेने वाहन चालवणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अपघातांचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो. त्यामुळे वाहन चालकांनी नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन वाहतूक विभागाने केले आहे.
बेशिस्त वाहन चालकांविरूद्ध वाहतूक विभागाकडून सातत्याने कारवाई करून दंड केला जात आहे. प्रामुख्याने मद्यपान करून वाहन दामटणारे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्याविरूद्ध ही मोहिम राबवली जात आहे. नियमांचे पालन करून स्वतःसह इतरांची काळजी घ्यावी.
हिम्मत जाधव, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग Pune Police Action
पुण्यात रांका ज्वेलर्सला मॅनेजरनेच घातला १८ कोटींचा गंडा, मॅनेजरसह त्रिकुटाला बेड्या खंडणी विरोधी पथकाची कारवाई
पुणे – Pune Police Action लक्ष्मी रोडवरील रांका ज्वेलर्स सराफा व्यावसायिकाला तब्बल १८ कोटी रुपयांचा गंडा घालणार्या तिघांना खंडणी विरोधी पथकाने अहिल्यानगरातून अटक केले आहे. त्यांच्याकडून दागिने, आलिशान कार, ३ लाख ३० हजारांचे मोबाइल, ८० हजारांची रोकड मिळून ५ कोटी २४ लाख ८२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. सराफा दुकानात ४२ वर्षांपासून काम करत असलेल्या मॅनेजरसह दोन साथीदारांच्या मदतीने १२ हजार ८०० ग्रॅम सोन्याचे दागिन्यांसह ७२ लाख लाख रूपये मिळून १८ कोटी ७२ लाख रुपयांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रशांत कांतीलाल बर्मेचा (वय ६१, रा. शांतीनगर सोसायटी, कोंढवा), रमाकांत महादेव पराळे (वय ६२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) आणि मधु ऊर्फ महेश्वरी रमाकांत पराळे (वय २२, रा. केडगाव, जि. अहिल्यानगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत श्रेयस अशोक रांका (वय ३७, रा. अशोक बंगला, सुजय गार्डन, मुकुंदनगर) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दिली आहे. ही घटना १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ कालावधीत घडली. Pune Police Action
Pune Police Actionआरोपी प्रशांत बर्मेचा हा ४२ वर्षांपासून रांका ज्वेलर्स यांच्याकडे कामाला होता. १९९२ मध्ये त्यांनी लक्ष्मी रोडला दुकान सुरु केल्याने त्याची तेथे बदली केली. बर्मेचा अनुभवाने ज्येष्ठ असल्याने त्याला कंपनीने मॅनेजर आणि कॅशिअर म्हणून जबाबदारी दिली होती. त्याच्या कामावर विश्वास ठेवून कंपनीने प्रशांत बर्मेचा याला सोने पुरवठादार व ग्राहक यांच्याकडून सोन्याचे दागिने खरेदी विक्रीची जबाबदारी दिली होती. मार्च २०२६ मध्ये वार्षिक ऑडिट कामी स्टॉक व्हेरिफिकेशनमध्ये सोन्याच्या दागिन्यांमध्ये १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे दागिने व ७२ लाख रुपयांचा हिशोब लागला नाही. त्यावेळी दुकानातील बर्मेचा याने चोरी, फसवणूक व विश्वासघात केल्याचे स्पष्ट झाले.
– अशी केली फसवणूक
सराफ दुकानात मागील ७ ते ८ महिन्यांपूर्वी कविता रमाकांत पराळे, तिची मुलगी मधु, पती रमाकांत पराळे हे दागिने खरेदी आले होते. त्यांची प्रशांत बर्मेचा याच्यासोबत ओळख झाली. त्यानंतर ते वारंवार दुकानात खरेदीसाठी येऊ लागले. बर्मेचाने सोन्याचे दागिन्यांची विक्री न दाखवता जागड (अॅप्रुव्हल) तत्वावर संचालकांना कळू नये, यासाठी स्वत: परस्पर नोंदी केल्या. कविताला दुकानात, काही वेळा दुकानाच्या बाहेर गाडीत दागिने नेऊन दिले. बर्मेचाने १ ऑक्टोबर २०२५ ते ३१ मार्च २०२६ या दरम्यान १८ कोटी रुपयांचे तब्बल १३९ वेळा १२ हजार ८०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने दिले. जानेवारी २०२६ मध्ये बर्मेचाने तिजोरीमधील ७२ लाख रुपये काढून शिपायाच्या हस्ते कारमध्ये बसलेल्या कविताजवळ दिले. दुकानात ऑडीटवेळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रांका यांनी २३ एप्रिलला फिर्याद दिली. Pune Police Action
आरोपी हे अहिल्यानगरमधील केडगाव येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार खंडणी विरोधी पथकाला आरोपी प्रशांत बर्मेचा हा रमाकांत पराळे याच्या घरी मिळून आला. पराळेच्या घरझडती घेतली असता ३ कोटी ९० लाख ७२ हजारांचे ३ किलो ५५२ ग्रॅम सोन्याचे दागिने, मोबाईल, मोटार, रोकड, असा ५ कोटी २४ लाख ८२ हजारांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह आयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, एसीपी राजेंद्र मुळीक, पोलिस निरीक्षक राम राजमाने, एपीआय कल्याणी कसोदे, उपनिरीक्षक अभिजित पवार, अनिल कुसाळकर, किरण पड्याळ, अजिनाथ येडे, कानिफनाथ कारखेले यांनी केली. Pune Police Action
पुण्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत तस्करांना दणका; १९ आरोपींना अटक, ५८ लाखांचे ड्रग्ज जप्त
पुणे- Pune Police Action : अमली पदार्थांचा बिमोड करण्यासाठी पोलीस प्रशासनाने मोहिम हाती घेतली आहे. त्यापार्श्वभूमीवर परिमंडळ सातच्या हद्दीत १ ते २३ एप्रिल कालावधीत अमली पदार्थ विरोधी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये तब्बल १३ गुन्हे दाखल करून १३ जणांना अटक केली होती. त्यांच्याकडे केलेल्या तपासात आणखी सहा जणांना राजस्थानातून ताब्यात घेत अटक केली आहे. संबंधितांकडून तब्बल ५८ लाख १८ हजारांचे विविध ड्रग्ज जप्त केले असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली आहे.

अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबविण्यासाठी परिमंडळ सातच्या हद्दीतील प्रत्येक पोलीस ठाण्यात विशेष पथक तयार केले होते. त्यानंतर १ ते २३ एप्रिल कालावधीत संबंधित पथकांनी मोहिम राबवून अमली पदार्थ विक्रेते, खरेदीदारांची उचलबांगडी केली. वाघोली, लोणीकंद, लोहगाव, विमानतळ, चंदननगर, खराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील माहिती प्राप्त करीत छापे टाकण्यात आले. त्यामध्ये मेफेड्रॉन (एम.डी), गांजा विक्रीसह सेवन करणार्याविरूद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत १३ गुन्हे दाखल केले आहे. अटक आरोपींकडे तपास केला असता, त्यांनी राजस्थानमधून मेफेड्रॉन (एम.डी) अंमली पदार्थ प्राप्त केल्याची माहिती दिली. Pune Police Action
आरोपींना अंमली पदार्थ पुरविणारे सहआरोपींची पथकाने नावे निष्पन्न केली. त्यानंतर आणखी एक विशेष पथक तयार करुन राजस्थानात पाठवण्यात आले. त्याठिकाणाहून ६ जणांना ताब्यात घेतले आहे. मोहिमेत १९ आरोपी अटक केली असून, ५८ लाख १८ हजारांचे ड्रग्ज जप्त केले आहे. त्यामध्ये २८९.१९ ग्रॅम (एम.डी), ४२२ ग्रॅम गांजा, २६० ग्रॅम (एमडीचा अंश पावडर) मुद्देमाल जप्त केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली. दरम्यन, आपल्या परीसरामध्ये कोणीही अमंली पदार्थाचे विक्री होताना अथवा सेवन करताना आढल्यास जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती देण्याचे आवाहन केले आहे.