Raga Time Theory : बदलत्या काळानुसार कालप्रहराचा विचार लवचीकतेचे होणे गरजेचे

परिसंवादातील सूर : डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनतर्फे ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’

पुणे – Raga Time Theory : संगीत क्षेत्राला हजारो वर्षांची परंपरा लाभलेली आहे. संगीताचे, रागांचे शास्त्र मांडताना, त्याची निर्मिती करताना अनेक गोष्टींचा सखोल अभ्यास, मनन-चिंतन झाले आहे. परंतु कालानुरूप या शास्त्रात, त्याच्या मांडणीत अनेकविध बदल घडत गेले आहेत. बदलत्या काळानुसार रागसंगीताचे चिंतन, अभ्यास, सादरीकरण यात कालप्रहराचा विचार शिथिल होणे गरजेचे असू शकते, परंतु त्यासाठी विषयाची सखोलता जाणून घेत कलाकाराची स्वानुभूती आवश्यक आहे, असा सूर परिसंवादात उमटला.

Pune ACB trap : पुण्यात लाच घेताना वनक्षेत्र ‘सर्व्हेअर’ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ रागप्रभा या संगीतोत्सवानिमित्त दुपारच्या सत्रात परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात पंडित अरुण कशाळकर, डॉ. अलका देव-मारुलकर, पद्मभूषण पंडित साजन मिश्रा, पंडित श्रीनिवास जोशी, डॉ. केशवचैतन्य कुंटे आणि कर्नाटक संगीत क्षेत्रातील डॉ. सुश्रुती संतानाम यांचा सहभाग होता. त्यांच्याशी सुप्रसिद्ध संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांनी संवाद साधला. डॉ. भारती एम. डी. आणि प्रसाद भडसावळे यांनी संयोजन केले.

पंडित अरुण कशाळकर म्हणाले

रागांची कालप्रहरानुसार मांडणी का केली गेली याविषयी सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. संस्कारांमुळे यात हस्तक्षेप करणे परंपरावादी व्यक्तींना रुचणार नाही. परंतु संगीताच्या सादरीकरणाचे अंतिम ध्येय हे आनंदनिर्मिती असल्यास राग समयानुसार संगीत सादरीकरण दुय्यम ठरू शकते. Raga Time Theory

पंडित साजन मिश्रा म्हणाले, बनारस घराण्याची परंपरा सुमारे साडेतीनशे वर्षांहून अधिक काळाची आहे. रागांचा रियाज आणि सादरीकरण त्या त्या कालानुरूप होणे या संस्कारात आम्ही वाढलो आहोत. परंतु प्रभाताईंच्या विचाराने प्रभावीत झाल्याने मी आयुष्यात दुसऱ्यांदाच रागाचे कालसंकल्पनेतून मुक्त सादरीकरण केले. रागाला आवाहन करून हृदयापासून त्याला शरण गेल्यास आणि गुरूकृपा प्राप्त असल्यास रागांचे कालसंकल्पनेतून मुक्त सादरीकरण देखील उत्तम होऊ शकते. आजच्या काळानुसार बदलत्या जीवनशैलीत कालानुरूप सादरीकरण किती प्रमाणात साध्य होऊ शकते याविषयी साशंक आहे, त्यामुळे मध्यम मार्गाचा अवलंब करता येऊ शकतो. Raga Time Theory

डॉ. अलका देव-मारुलकर म्हणाल्या, संगीत क्षेत्रात काळानुरूप रागप्रहरांचे वर्गीकरण बदलत गेले. वैज्ञानिकदृष्टीने संगीताचा, ध्वनीचा आपल्या शरीर-मनावर कसा परिणाम होतो याचा शास्त्रीय अभ्यास होणे गरजेचे आहे. पूर्वसुरींनी अल्पत्व आणि बहुत्वाच्या मात्रेत संगीतरचना करत समकक्ष रागांची निर्मिती केली. त्यामुळे त्यांच्या विचारांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. एक प्रयोग म्हणून कालसंकल्पनेतून मुक्त रागांचे सादरीकरण करता येऊ शकते. परंतु यासाठी रागाशी एकरूपता आणि स्वानुभूती तसेच श्रोते व गायक यातील परस्पर पूरक संवाद महत्वाचा ठरतो. त्यामुळे हा विषय लवचिकतेने हाताळणे हा त्या त्या कलाकाराचा निर्णय असावा.

Raga Time Theory डॉ. केशवचैतन्य कुंटे यांनी हिंदुस्तानी रागसमयाचा सिद्धांत, त्यांच्या प्राचीन काळातील नोंदी, रागांचे ऋतुंशी व काळाशी असलेले संबंध, रागसंगीतातील विविध परंपरा याविषयी अवगत केले.

डॉ. सुश्रुती संतानाम म्हणाल्या, दक्षिण भारतीय संगीतात आजच्या काळात कालानुरूप सादरीकरण असे नियम पाळले जात नाहीत. रागाचा संबंध शास्त्रासह समाजाशी आहे, लक्षणांच्या आधारावर आहे, असे मानले जाते. कलाकाराने स्वत:ची आकलन क्षमता वाढवत रागांचे रूप समजून घेणे आवश्यक आहे. वाग्येयकाराच्या कृतीनुसार रागसंगीतातून वेगवेगळी रसोत्पत्ती होते याची कलाकाराने स्वानुभूती घेणे आवश्यक आहे. Raga Time Theory

पंडित श्रीनिवास जोशी म्हणाले, संगीत क्षेत्रात सादरीकरणाबाबत कुठलीही विशिष्ट आचारसंहिता नाही. दिवसभरात कुठलाही राग कुठल्याही वेळी गावा का याविषयी चर्चा होत असताना आज रसिकांची समज किती आहे हे तपासून पाहणे देखील आवश्यक आहे. परंपरेचे पालन करण्याची ताकद कलाकारात असली तर कालानुरूप बदल घडणार नाहीत. Raga Time Theory

परंतु किराणा घराण्याच्या परंपरेत बंड करण्याची वृत्ती दिसून येते. प्रभाताईंचे विचार योग्य आहेत परंतु संगीत शास्त्रानुसार यावर विचार होणे आवश्यक आहे. काही अनवट, अप्रचलित राग काळाच्या पडद्याआड जाऊ नये याकरिता या स्वातंत्र्याचा उपयोग होऊ शकतो.सांगीतिक महोत्सवाचा समारोप रविवारी सायंकाळी विदुषी आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या गायनाने आणि पद्मभूषण पंडित विश्वमोहन भट्ट यांच्या मोहनवीणा वादनाने झाला. अंकलीकर-टिकेकर यांनी सालग वराळी तोडी आणि ब्रिन्दावणी सारंग रागातील रचना सादर केल्या. पंडित विश्वमोहन भट्ट यांनी नटभैरव रागातील विविध छटा सादर केल्या. गायन, वादनाची मैफल रसिकांना सुखावून गेली. Raga Time Theory

Leave a Comment