बाणेर पोलिसांकडून दोघांना अटक
पुणे प्रतिनिधी
पुणे – Pune Crime News : हळदीच्या पाकिटातून गांजा विक्री करणाऱ्या दोघांना बाणेर पोलिसांनी अटक केली. आरोपींकडून १६ किलो गांजासह परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी अभिषेक बोरसे आणि अक्षय बोरसे (दोघे रा. पिंपरी-चिंचवड) यांना अटक करण्यात आली आहे.
पुणे पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ज्येष्ठ महिलेला मिळाला घराचा ताबा – बातमी वाचा
आरोपी बोरसे हे शहराच्या वेगवेगळ्या भागात गांजा विक्री करत होते. संशय येऊ नये म्हणून ते गांजा हळदीच्या पाकिटात लपवून विक्री करत होते. गांजा विक्रीबाबत कोणाला संशय येऊ नये म्हणून दोघे जण एका खासगी कंपनीत काम करत होते. बाणेर परिसरात दोघे जण दुचाकीवरुन येणार असून, ते गांजा विक्री करणार असल्याची माहिती बाणेर पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून दोघांना पकडले. पोलिसांनी दोघांची झडती घेतली. त्यांच्याकडे असलेल्या पिशवीत हळदीची पाकिटे सापडली. तपासणीत पाकिटात गांजा लपविल्याचे उघडकीस आले.
पोलिसांनी त्यांच्याकडून तीन किलो गांजा जप्त केला. आरोपी बाेरसे यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा दोघांनी पिंपरी चिंचवडमधील घरात गांजा लपवून ठेवल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी घराची झडती घेतली. घरातून पोलिसांनी १३ किलो गांजा जप्त केला. आरोपींनी गांजा कोठून आणला, तसेच ते कोणाला विक्री करणार होते ?, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ तस्करांविरुद्ध कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. आठवडापूर्वी लोणी काळभोर भागात एकाकडून गांजा जप्त करण्यात आला होता.
लोणी काळभोरमध्ये मद्यपीकडून रुग्णालयात तोडफोड
Pune Crime News : मद्यपी तरुणाकडून डाॅक्टरांना धक्काबुक्की करुन रुग्णालयात तोडफोड करण्यात आल्याची घटना लोणी काळभोर भागात घडली. याप्रकरणी मद्यपी तरुणाविरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी संतोष रमेश गुंजाळ (वय ३५, रा. काकडे वस्ती, थेऊर, पुणे-सोलापूर रस्ता) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत डाॅक्टरांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डाॅक्टरांचा पुणे-सोलापूर रस्त्यावरील थेऊर फाटा येथे रुग्णालय आहे. आरोपी गुंजाळ हा बुधवारी (१८ मार्च) दुपारी पावणेएकच्या सुमारास रुग्णालयात आला. त्याच्या डोक्याला दुखापत झाली होती. डाॅक्टरांनी मलमपट्टी केली. वैद्यकीय उपचाराचे त्यांनी पैसे मागितले. तेव्हा गुंजाळने पैसे देण्यास नकार देऊन डाॅक्टरांसह रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रुग्णालयात त्याने गोंधळ घातला. त्यानंतर त्याने रुग्णालयातील काच फोडली. काचेचा तुकडा रुग्णाच्या हाताला लागल्याने जखम झाली. डाॅक्टरांना दगड फेकून मारला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.
बँकेतील आरटीजीएस फॉर्म चोरून फेरफार
Pune Crime News – आयडीबीआय बँकेच्या शाखेत ग्राहकाने सादर केलेला आरटीजीएस फॉर्म चोरून त्यात फेरफार करत साडेसात लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार कोथरूडमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपींविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरणकुमार मारुती व्हटकर (वय ४७, रा. बसीलिओ सोसायटी, पिंपळे गुरव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार राहुल हरिभाऊ कळलोसे (वय ३५) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयडीबीआय बँकेच्या गुजरात कॉलनी शाखेत १७ मार्चला दुपारी दीडच्या सुमारास प्रकार घडला. खातेदार सुषमा सुशील नरखेडे यांनी त्यांच्या बँक ऑफ महाराष्ट्र खात्यातून ७ लाख ५० हजार रुपये आरटीजीएसद्वारे वर्ग करण्यासाठी फॉर्म आणि धनादेश कस्टमर सर्व्हिस टेबलवरील ट्रेमध्ये ठेवले होते. संधीचा फायदा घेत आरोपीने हा फॉर्म व धनादेश चोरून त्यात फेरफार केला. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने फॉर्मवर स्वतःचे नाव व बँक खात्याचा क्रमांक नमूद केला. त्यानंतर हा बनावट आरटीजीएस फॉर्म कॅश काऊंटरवर सादर करून रक्कम वळवून घेत बँकेची फसवणूक केली. याप्रकरणी आरोपीचा शोधण्याचे काम सुरू आहे.
ऑनलाइन ट्रेडिंगच्या आमिषाने ६२ लाखांची फसवणूक
Pune Crime News – ऑनलाइन ट्रेडिंगमध्ये नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत सायबर चोरट्यांनी एकाची ६२ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सायबर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजेश सुधाकर सोवळे (वय ४०, रा. साईशिल्प बिल्डिंग, साईनगरी, चंदननगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात मोबाइल धारक, विविध बँक खातेधारक तसेच लिंकद्वारे व्यवहार करणाऱ्या संबंधितांवर गुन्हा नोंदविला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्यांनी तक्रारदाराशी संपर्क साधून शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. २८ डिसेंबर २०२५ ते ३ फेब्रुवारी २०२६ कालावधीत विश्वास संपादन करत तक्रारदाराला विविध लिंक पाठवल्या. वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यास प्रवृत्त केले. तक्रारदाराने त्यांच्या सांगण्यावरून टप्प्याटप्प्याने ६२ लाख ९० हजार रुपये भरले. मात्र त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Pune Crime News