कारमधील रोकड चोरी, रिक्षा अडवून लुटमार आणि गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
पुणे – Pune Crime News : शहरातील कल्याणीनगर परिसरात पार्क केलेल्या कारच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी ३० हजारांची रोकड तसेच कागदपत्रे चोरून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीने येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, दोन अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा नोद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी भरदुपारी अडीचच्या सुमारास घडला आहे.
Pune Crime News : पुण्यात दुर्घटना, दहशत आणि सायबर गुन्ह्यांची मालिकाच सुरूच
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे कल्याणीनगर भागात राहण्यास आहेत. त्यांनी त्यांची कार लेन नंबर ६ मध्ये पार्क केलेली होती. कारच्या डिक्कीत दोन लेदरच्या बॅग व त्यात ३० हजारांची रोकड होती. तर काही कागदपत्रेही होती. अज्ञात चोरट्यांनी त्याच्या डिक्की कशाच्यातरी सहाय्याने उघडून त्यातून या वस्तू चोरून नेल्या. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक फंटागरे हे करत आहेत.
ट्रॅव्हल्स आरटीओकडे नोंदणी न करता रस्त्यावर
प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये (आरटीओ) ट्रॅव्हल्सची नोंदणी न करता दुसऱ्या बसचा क्रमांक लावून ती रस्त्यावर आणल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात ३० वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हडपसरमधील रविदर्शन चौकात हा प्रकार उघडकीस आला आहे.
वानवडीत दुचाकीस्वारांकडून रिक्षा अडवून लुटमार – तीन अनोळखी चालकांविरोधात गुन्हा
पुणे – Pune Crime News : शहरात वानवडी परिसरात चोरट्यांनी रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका ज्येष्ठाला लुटल्याची घटना घडली. दुचाकीवरून या तिघांनी रिक्षाचा पाठलागकरून तो रिक्षा अडविला आणि त्यानंतर धक्काबुक्कीकरून ६० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी ७५ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून अनोळखी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे. हा प्रकार दोन दिवसांपुर्वी रात्री साडे दहाच्या सुमारास घडला आहे. Pune Crime News
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे वानवडीत राहण्यास आहेत. ते बाहेर गेले होते. तेथून ते घरी परतत होते. त्यांनी प्रवासी रिक्षा घेतली. रिक्षाने ते परत येत असताना राईट फ्लॉक रोडवरील मधूरावाला ग्राऊंड येथे आले असता दुचाकीवरून पाठिलाग करणाऱ्या चोरट्यांनी त्यांची रिक्षा अडवली. तसेच, त्यांना धक्काबुक्की करत धमकावून त्यांच्याकडील ६० हजार रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेली. तक्रारदारांनी आरडाओरडा केला, पण चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक बाळासाहेब वाकडे हे करत आहेत.
जास्त परताव्याचे आमिष पडले २० लाखांना
पुणे- Pune Crime News : शेअरसह आयपी ट्रेडिंगमध्ये कमी गुंतवणूकीवर जास्त परतावा मिळवून देण्याच्या बतावणीने सायबर चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाला २० लाख ६० हजार रुपयांना गंडा घातला. ही घटना २३ जानेवारी ते २१ फेब्रुवारी २०२६ कालावधीत पर्वती परिसरात घडली आहे. याप्रकरणी ७३ वर्षीय नागरिकाने पर्वती पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी मोबाईल धारक व लिंक धारक तसेच बँकेचे खाते धारक यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे जेष्ठ नागरिक असून, दत्तवाडी परिसरात राहण्यास आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांना ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधला. शेअर व आयपी ट्रेडिंगचमध्ये कमी गुंतवणूक केल्यानंतर जास्त परतावा मिळवून देण्याची बतावणी केली. त्यांचा विश्वास संपादन केला. सायबर चोरट्याने त्यांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून २० लाख ६० हजार रुपये वर्ग करून घेतले. परतावा न देता त्यांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत. Pune Crime News
शेअर गुंतवणूकीवरील चांगला परतावा देण्याच्या बहाण्याने दुसऱ्या घटनेत सायबर चोरट्यांनी एका व्यक्तीची तब्बल ४५ लाख २५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी नांदेडसिटी पोलिस ठाण्यात ५२ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. २ ऑगस्ट २६ सप्टेंबर २०२५ या एका महिन्यात ही फसवणूक झाली आहे. त्यानूसार, अज्ञाताविरूद्ध गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार धायरीत राहण्यास असून, त्यांना शेअर गुंतवणूकीवरील चांगला परतावा देण्याच्या बहाणाकरून पैसे उकळले आहेत. अधिक तपास उपनिरीक्षक प्रसाद राऊत हे करत आहेत.
बिल अपडेटच्या बहाण्याने फसवणूक
Pune Crime News बिल अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी जेष्ठ नागरिकाची साडे तीन लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात ६९ वर्षीय नागरिकाने तक्रार दिली आहे. त्यानूसार सायबर चोरट्यांविरूद्द गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार हे कोथरूडमध्ये राहत असून, त्यांना सायबर चोरट्यांनी सातत्याने कॉल व मेसेज करून बिल अपडेट करण्यास सांगितले. त्यांना एक एपीके फाईल पाठविली. तक्रारदारांनी ती उघडली असता त्यांच्या मोबाईलचा ताबा घेऊन सायबर चोरट्यांनी त्यांच्या खात्यावरून ३ लाख ४४ हजार रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून फसवणूक केली.