Pune Crime News : पुण्यात दुर्घटना, दहशत आणि सायबर गुन्ह्यांची मालिकाच सुरूच

एरंडवणेतील टाकी दुर्घटनेत कामगाराचा मृत्यू; कोथरूडमध्ये टोळक्याची दहशत; ऑनलाइन फसवणुकींच्या घटनांत वाढ

पुणे प्रतिनिधी – Pune Crime News : इमारतीच्या छतावर प्लास्टिक टाकी बसविताना झालेल्या दुर्घटनेत टाकी कोसळून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना एरंडवणे भागातील एका सोसायटीत घडली. दुर्घटनेस जबाबदार ठरल्या प्रकरणी एका विरुद्ध डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. राहुल श्रीकांत सतनामी (वय २१, रा. रायकर मळा, धायरी, सिंहगड रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याची आई सीमा (वय ४४) यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Crime News : पुण्यात चोरी आणि बाँम्ब धमकीचे प्रकार; पोलिसांचा तपास सुरू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एरंडवणे परिसरातील गुलमोहोर अपार्टमेंटच्या आवारात रोगनिदान केंद्र (पॅथोलाॅजी लॅबोरटरी) आहे. रोगनिदान केंद्रात पाणी पुरवठा करण्यासाठी टाकी बसविण्याचे काम २० फेब्रुवारी रोजी दुपारी करण्यात येत होते. टाकी बसविण्यासाठी गजाचा आधार देण्यात आला होता. त्या वेळी गज तुटल्याने टाकी बसविणाऱ्या राहुल सतनामी याच्या अंगावर टाकी काेसळली. त्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.

कोथरूडमधील सोसायटीत टोळक्याची दहशत

Pune Crime News – वैमनस्यातून टोळक्याने दहशत माजविल्याची घटना कोथरूडमधील श्रावणधारा एसआरए वसाहतीत घडली. एका तरुणाच्या घरात शिरून टोळक्याने साहित्याची तोडफोड केली. तीक्ष्ण शस्त्राचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सहा जणांना अटक केली. याप्रकरणी अजय सुनील महाजन (वय २१, रा. कोथरूड), अभिजित गंगाधर ओव्हाळ (वय ३०), सनी अविनाश सत्रके (वय २०), अभि उर्फ अभिषेक घारे (वय २०), समर्थ राजेश जगताप (वय १८), सूरज छगन कदम (वय २६, सर्व रा. श्रावणधारा सोसायटी, कोथरूड) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी त्यांच्याबरोबर असलेल्या चार साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत राहुल सुभाष गायकवाड (वय २२, रा. कोथरूड) याने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड आणि आरोपींमध्ये भांडणे झाले होते. वादातून १९ मार्च रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास राहुल गायकवाड घरी होता. त्या वेळी आरोपी गायकवाड याच्या घरात शिरले. घराचा दरवाजा, गॅस शेगडी, स्टिलची भांडी, तसेच भिंतीवर कोयते आपटून दहशत माजविली. त्यानंतर आरोपींनी सोसायटीतील रहिवाशांना शिवीगाळ करुन दहशत माजविली. सोसायटीतील दोघांना मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तपास करत आहेत.

‘ऑनलाइन टास्क’च्या आमिषाने महिलेची फसवणूक

Pune Crime News – घरातून ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी असे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी चंदननगर भागातील एका महिलेची ३ लाख १९ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत एका ४८ वर्षीय महिलेने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Pune Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला चंदननगर भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइलवर काही दिवसांपूर्वी संदेश पाठविला होता. ऑनलाइन पद्धतीने काम केल्यास चांगले पैसे मिळतील. एका तारांकित हाॅटेलला दर्शक पसंती (रिव्ह्यूज) मिळवून द्यायचे आहेत, अशी बतावणी करुन चोरट्यांनी महिलेला जाळ्यात ओढले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या खात्यात परताव्यापोटी काही रक्कम दिली. परतावा मिळाल्याने महिलेचा विश्वास बसला. चोरट्यांनी ऑनलाइन टास्कमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. पैसे गुंतविल्यानंतर चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. त्यानंतर महिलेने चोरट्यांच्या खात्यात पैसे जमा केले. पैसे जमा केल्यानंतर महिलेला परतावा दिला नाही, तसेच मूळ रक्कमही दिली नाही. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलेश बडाख तपास करत आहेत.

इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या ज्येष्ठाची फसवणूक

Pune Crime News – गॅस टंचाईची झळ सामान्यांना बसली आहे. गॅस टंचाईमुळे ऑनलाइन इलेक्ट्रीक शेगडी खरेदी करणाऱ्या एका ज्येष्ठ नागरिकाची सायबर चोरट्यांनी ३ लाख १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक हे कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांनी समाज माध्यमात इलेक्ट्रीक शेगडीची जाहिरात पाहिली होती. गॅस टंचाईमुळे त्यांनी शेगडी खरेदी करण्याचे निश्चित केले. त्यानंतर त्यांनी जाहिरातीतील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. सायबर चोरट्यांनी शेगडी खरेदीचे पैसे ऑनलाइन पद्धतीने जमा करावे लागतील, असे त्यांना सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या बँक खात्याची माहिती घेतली.

या माहितीचा दुरुपयोग करुन चोरट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या बँक खात्यातून तीन लाख दहा हजार रुपये दुसऱ्या एका खात्यात हस्तांतरित केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत. Pune Crime News

गॅस टंचाईमुळे चोरट्यांकडून नागरिकांना इलेक्ट्रीक शेगडी, तसेच सिलिंडर देण्याचे आमिष दाखविले जात आहे. नागरिकांनी चोरट्यांच्या बतावणीकडे दुर्लक्ष करावे. गॅस वितरण करणाऱ्या कंपनीच्या नावे फसवणूक करणारे संदेश चोरट्यांकडून पाठविले जातात, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. Pune Crime News

Leave a Comment