वारजे परिसरातील घटना; पोलिसांकडून पतीला अटक, मध्यरात्री पेट्रोल ओतून कृत्य
पुणे – Pune crime : पत्नीने वादातून नांदण्यास नकार दिल्याने एकाने तिची दुचाकी पेटवून दिल्याची घटना वारजे भागात घडली. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजकुमार इरन्ना सुतार (वय २७, रा. समर्थनगर, सिंहगड रोड) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या पत्नीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune Crime News : पुण्यात चोरी, लुटमार आणि सायबर फसवणुकीच्या घटनांत वाढ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी आणि आराेपी सुतार यांचा विवाह झाला. विवाहानंतर त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर ती माहेरी निघून आली. पत्नी वारजे – एनडीए रस्त्यावरील शिवणे परिसरात असलेल्या एका सोसायटीत राहायला आहे. गेले दीड महिने पत्नी नांदायला येत नसल्याने आरोपी सुतार तिच्यावर चिडला होता. रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास तो पत्नी राहत असलेल्या सोसयाटीत आला. त्याने पत्नीची दुचाकी पेट्रोल ओतून पेटवून दिली.
आग भडकल्यानंतर दुचाकी पूर्णपणे जळाली. पत्नीने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली. पतीने दुचाकी पेटवून दिल्याचा संशय तिने फिर्यादीत व्यक्त केला. त्यानंतर पोलिसांनी सुतार याला अटक केली. पोलीस उपनिरीक्षक सुनील जगदाळे तपास करत आहेत. विश्रांतवाडीतील धानोरी भागात एका सोसायटीत तरुणासाेबत वाद झाल्यानंतर त्याची दुचाकी पेटवून देण्याची घटना नुकतीच घडली होती. दुचाकीला आग लागल्यानंतर सोसायटीतील अन्य वाहनांना झळ पोहोचली होती. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी एकाला अटक केली होती.