पुणे – Pune Crime : तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून दीड लाख रुपयांचे दागिने चोरून नेण्यात आल्याची घटना घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रादार महिला मूळच्या मुंबईतील आहेत. कफ परेड परिसरात त्या राहायला आहेत. २१ मार्च रोजी सायंकाळी त्या तुळशीबागेत खरेदीसाठी आल्या होत्या. महिलेने दागिने पर्समध्ये ठेवले होते. गर्दीत चोरट्याने पर्समधील दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तुळशीबागेतील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले आहे. पोलीस हवालदार गोंजारी तपास करत आहेत.
तुळशीबागेत गेल्या काही महिन्यांपासून चोरट्यंचा सुळसुळाट झाला आहे. खरेदीसाठी आलेल्या महिलांकडील दागिने लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. Pune Crime
वैमनस्यातून तरुणाचा खुनाचा प्रयत्न
पुणे- Pune Crime वैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना कात्रजमधील आंबेगाव भागात घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल शिवाजी शेळके (वय २६, रा. भोलेनगर, आंबेगाव खुर्द) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सादर शेख (वय १९), राजप्पा यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शेळके याने आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेळके याची आराेपींशी भांडणे झाली होती. २६ मार्च रोजी तो आंबेगावमधील भिमाई चौकातून मित्रासोबत निघाला होता. त्या वेळी आरोपींनी शेळके आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्राला अडवले. दोघांना शिवीगाळ केली. आरोपींनी शेळके याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक भोजलिंग दोडमिसे तपास करत आहेत.
उपाहारगृहातील गॅस गळतीमुळे चार कामगार होरपळले
पुणे – भारती विद्यापीठ परिसरातील एका उपाहारगृहात गॅसगळती झाल्यानंतर चार कामगार होरपळले. कामगारांना गंभीर दुखापत झाली नाही. भारती विद्यापीठ परिसरात नादब्रम्ह इडली हे उपाहारगृह आहे. शुक्रवारी सायंकाळी उपाहारगृहात गॅस गळती झाली. भडका उडाल्याने भटारखान्यात काम करणारे चार कामगार होरपळले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचेपर्यंत नागरिकांनी कामगारांना खासगी रुग्णालयात दाखल केले. कामगारांच्या हात आणि पायाला किरकोळ स्वरुपाची दुखापत झाली आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळती रोखली. गॅस गळती झाल्यानंतर भडाका उडाला. उपाहारगृहातील छताचे नुकसान झाले, तसेच खिडक्यांचा काचा फुटल्या. जवानांनी उपाहारगृहाची पाहणी केली. तेथे व्यावसायिक वापराचे दोन सिलिंडर आढळून आले. गॅसगळती रोखल्यानंतर उपाहारगृहाची पाहणी केली. धोका नसल्याची खात्री केल्यानंतर जवान तेथून रवाना झाले.
महिलेवर अत्याचार प्रकरणात भोंदू ऋषीकेश वैद्यला पिंपरीतून अटक
पुणे – Pune Crime दैवी शक्तीचा संचार असल्याची बतावणी करून महिलेवर अत्याचार करुन पसार झालेला भोंदू ऋषीकेश वैद्य याला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पिंपरीतून अटक केली. याबाबत एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली होती. पीडित महिला मूळची पुण्यातील आहे. ऑक्टोबर २०२३ मध्ये महिलेची भोंदू ऋषीकेश वैद्य याच्याशी समाज माध्यमातून ओळख झाली. आरोपी मूळचा वसईचा आहे. पीडित महिला व्रतवैकल्ये करायची. भोंदूने तिला जाळ्यात ओढले. ‘माझ्यात दैवी संचार आहे. ईश्वराची उपासना कशी करायची, याचे तंत्र तुला शिकवितो,’ अशी बतावणी त्याने महिलेकडे केली. Pune Crime
त्याने महिलेला जाळ्यात ओढले. आरोपी २०२३ मध्ये पुण्यात आला. त्याने पीडित महिलेची मांजरी परिसरात भेट घेतली. त्यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. आरोपीने तिला पुन्हा वसईत बोलावले. वसईतही तिच्यावर बलात्कार केला.
नाशिकमधील भोंदू अशोक खरात याने महिलांना जाळ्यात ओढून बलात्कार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुण्यातील पीडित महिलेने पाेलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती तिने पोलिसांनी दिली. सुरुवातीला तिने वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. वसई पोलिसांनी संंबंधित गुन्हा तपासासाठी पुण्यातील हडपसर भागात मांजरी पोलीस ठाण्यात वर्ग केला. Pune Crime
Pune Crime वैद्य याचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची चार पथकांकडून शोध घेण्यात येत होता. वैद्य हा पिंपरी परिसरात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने त्याला अटक केली, अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली. ‘वैद्य याने आणखी काही महिलांवर अत्याचार केल्याची शक्यता आहे. दैवी शक्तीचा संचार झाल्याची बतावणी करून त्याने महिलेवर अत्याचार केेले. अशा प्रकारची कुणाची तक्रार असल्यास पीडित महिलांनी पुणे पोलिसांकडे तक्रार द्यावी,’ असे आवाहन त्यांनी केले आहे.