मुळशी ते बाळगंधर्व रंगमंदिर असा मार्ग निश्चित; सुट्टीच्या दिवशी सुरुवात-समारोप ठेवत वाहतूक अडथळे टाळण्याचे प्रशासनाचे नियोजन
पुणे – Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ (सीझन 2) या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकल स्पर्धेचा शुभारंभ प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याने 26 जानेवारी 2027 रोजी होणार असून समारोप 31 जानेवारी रोजी होणार आहे. स्पर्धेची सुरुवात आणि समारोप दोन्ही टप्पे सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आले असून यामुळे पुणेकरांना कोणतीही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली.
Pune Grand Tour 2027 जिल्हाधिकारी कार्यालयात रस्ते, वाहतूक व्यवस्थापन आणि स्पर्धेच्या मार्गनिश्चितीसंदर्भात आयोजित प्राथमिक बैठकीत ते बोलत होते.
नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होऊ नये आणि पुणेकरांना स्पर्धेचा आनंद मनमुराद घेता यावा, या उद्देशाने नियोजनात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार स्पर्धेचा पहिला टप्पा मुळशी प्राधिकरणातील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ते हिंजवडी असा निश्चित करण्यात आला आहे. या मार्गामुळे आधुनिक आयटी हब आणि निसर्गरम्य मुळशी परिसर यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे. Pune Grand Tour 2027
स्पर्धेचे टप्पे पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात आले आहेत
पहिला टप्पा (मुळशी ते हिंजवडी) – दि. 26 जानेवारी 2027 (मंगळवार)
दुसरा टप्पा (बारामती ते सासवड) – दि. 27 जानेवारी 2027 (बुधवार)
तिसरा टप्पा (जुन्नर ते राजगुरुनगर) – दि. 28 जानेवारी 2027 (गुरुवार)
चौथा टप्पा (आळंदी ते लोणावळा/खंडाळा) – दि. 29 जानेवारी 2027 (शुक्रवार)
पाचवा टप्पा (लोणावळा/खंडाळा ते हिंजवडी) – दि. 30 जानेवारी 2027 (शनिवार)
सहावा व अंतिम टप्पा (पीसीएमसी ते बाळगंधर्व रंगमंदिर) – दि. 31 जानेवारी 2027 (रविवार)
Pune Grand Tour 2027 या स्पर्धेमुळे पुणे जिल्ह्याच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक वैभवाची झलक एकाच व्यासपीठावर अनुभवायला मिळणार आहे. सिंहगड परिसर, सासवडचा वारसा, जुन्नर-राजगुरुनगरचा ऐतिहासिक पट्टा तसेच लोणावळा-खंडाळ्याचा निसर्गरम्य घाट यामुळे स्पर्धेला विशेष आकर्षण लाभणार आहे.
स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर वाहतूक नियोजन, सुरक्षा व्यवस्था, वैद्यकीय सुविधा आणि स्वयंसेवक व्यवस्थापनाबाबत सर्व संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना वाहतूक खोळंबा जाणवू नये यासाठी प्रशासनाकडून आतापासूनच नियोजनबद्ध तयारी सुरू असून त्याचा वेळोवेळी आढावा घेतला जाणार असल्याचेही जिल्हाधिकारी डुडी यांनी स्पष्ट केले. Pune Grand Tour 2027
यावर्षी झालेल्या स्पर्धेमुळे पुण्याची ओळख जागतिक स्तरावर अधोरेखित झाली आहे. आगामी ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ ही स्पर्धा त्यापेक्षाही अधिक भव्य, नियोजनबद्ध आणि यशस्वी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असून ही स्पर्धा केवळ क्रीडा उपक्रम न राहता पुणे जिल्ह्याच्या पर्यटन, क्रीडा आणि आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
2 thoughts on “Pune Grand Tour 2027 : पुणे जिल्ह्यात ‘पुणे ग्रँड टूर – 2027’ सायकल स्पर्धेची घोषणा; 26 ते 31 जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांत रंगणार”