Pune Crime News : पुण्यात फसवणूक आणि चोरीचे प्रकार उघड; साडेसात लाखांची फसवणूक

परदेशी चलनाच्या आमिषाने आर्थिक फसवणूक; तर कात्रज प्राणीसंग्रहालयात चंदनाच्या झाडांवर चोरट्यांचा डोळा

पुणे प्रतिनिधी 

पुणे – Pune Crime News : परदेशी चलन देण्याच्या आमिषाने एकाची साडेसात लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चौघां विरुद्ध विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला. प्रसन्न मंडावले, शिवम भोजने, राजेश म्हस्के (तिघे रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत एकाने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे तक्रारदाराच्या ओळखीचे आहेत. आरोपीने त्यांनी अमेरिकन डाॅलर देण्याचे आमिष तक्रारदाराला दाखविले होते. त्यानंतर तक्रारदाराने आरोपींना सात लाख ४५ हजार रुपये आरोपींना दिले. पैसे दिल्यानंतर आरोपींनी त्यांना परदेशी चलन दिले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक शिरसाट तपास करत आहेत.

कात्रज येथील प्राणी संग्रहालयातून झाडे चोरीचा प्रयत्न

Pune Crime News : शहरातील कात्रज येथील राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात शिरलेल्या चोरट्यांनी झाडे कापून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सुरक्षारक्षक श्रीपती देवीदास कसबे (वय ३०, रा. शिवनेरीनगर, कोंंढवा) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीव गांधी प्राणीसंग्रहालयाच्या आवारात मध्यरात्री चोरटे शिरले. चोरट्यांनी आवरातील चंदनाची चार झाडे कापून नेण्याचा प्रयत्न केला. सुरक्षारक्षकांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर चोरटे पसार झाले. यापूर्वी प्राणी संग्रहालयाच्या आवारातून चंदनाची झाडे कापून नेण्यात आल्याच्या घटना घडल्या होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार खिलारे यांनी प्राणीसंग्रहालयास भेट दिली असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. प्राणीसंग्रहालयाच्या आवारात सीसीटीव्ही कॅमेेरे बसविण्यात आले आहेत. चित्रीकरण तपासून चोरट्यांचा माग काढण्यात येत आहे. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील तपास करत आहेत.

Leave a Comment