नागरिकांच्या तक्रारींवर थेट गुन्हे दाखल; आयुक्त अमितेश कुमार यांचा इशारा
पुणे – Pune Police : शहरातील विविध बेकायदा होर्डिंग्जविरोधात आता थेट नागरिकांची मदत घेतली जाणार असून, त्याद्वरे कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. संबंधित बेकायदा होर्डिंगची माहिती ‘पीटीपी’ अॅपवर कळवावी. त्यानुसार आम्ही थेट गुन्हे दाखल करू अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. प्रामुख्याने नियमांना हरताळ फासत होर्डिंग उभारणार्यांना टागरेट केले जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
Mundhwa Magarpatta Road Waterlogging : मगरपट्टा-मुंढवा रस्त्यावर कालवा फुटल्याने वाहतूक विस्कळीत
पुणे महानगरपालिका आणि पुणे पोलिसांनी नुकतेच ‘होर्डिंगमुक्त पुणे’ मोहिमेची संयुक्त घोषणा केली आहे. त्याअंतर्गत शहरभर बेकायदा होर्डिंग्जबाबत धडक कारवाईला सुरूवात झाली आहे. दरम्यान, या मोहिमेत नागरिकांची भूमिका महत्त्वाची ठरणार असल्यामुळे आता ‘पीटीपी’ अॅपद्वारे बेकायदा होर्डिंगवर उतारा शोधण्यात आला आहे. रस्त्यावरील बेवारस वाहने आणि वाहतुकीला अडथळा निर्माण करणार्या वाहनांची माहिती देण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. ‘पीटीपी’ अॅपद्वारे सर्वाधिक तक्रारी नोंदविणार्या नागरिकांचा वाहतूक शाखेने सोमवारी (दि. २३ ) गौरव केला. जानेवारी २०२६ पासून सुरू झालेल्या मोहिमेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिला आहे. Pune Police
१ लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी केला अॅपचा
पुण्यात आतापर्यंत १ लाख ५५ हजारांहून अधिक नागरिकांनी अॅपचा वापर केला आहे. त्याद्वारे २ लाख ४९ हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. पडताळणीनंतर १ लाख ७६ हजारांहून अधिक बेशिस्तांविरूद्ध चलन पाठवून कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. फेब्रुवारी महिन्यातील विजेत्यांना रोख पारितोषिके देण्यात आली. प्रथम क्रमांकाला ५० हजार, तर इतरांना ५ ते २५ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली. तसेच ‘पीटीपी’ अॅपवरील तक्रारींवर प्रभावी कारवाई करणार्या तीन पोलिस अंमलदारांचाही पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सन्मान केला. यावेळी सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, उपायुक्त (वाहतूक) हिम्मत जाधव उपस्थित होते.
‘पीटीपी’ अॅप डाउनलोड करून त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त वापर करावा. विशेषतः वाहतूक नियमभंग करणारे, बेकायदा होर्डिंग लावणारे, रस्त्यावर अडथळा निर्माण करणार्यांविरोधात आम्ही कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. नागरिकांनो तुम्ही पीटीपी अॅपवर माहिती द्या, संबंधिताविरूद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे. Pune Police
अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर